शनिवार, ९ मे, २०२६

मैत्रीचा 'हायवे' आणि माणुसकीचा 'प्रवास': अनिल सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 काही नाती रक्ताची नसतात, पण ती काळजाच्या अगदी जवळ असतात. २०१२ ते २०१४ हा काळ माझ्यासाठी संघर्षाचा पण तितकाच शिकवणारा होता. सातारा जिल्ह्यातील 'भरतगाव' ते सांगलीतील 'नेर्ले' (GCG इंग्लिश मीडियम स्कूल) असा माझा प्राथमिक शिक्षक म्हणून होणारा प्रवास... आणि या प्रवासात मला भेटलेले एक अजब व्यक्तिमत्व म्हणजे श्री. अनिल ढवळे सर.



योगायोगाची सुरुवात:
दर १५ दिवसांनी गावी जाऊन पुन्हा शाळेकडे परतताना, एन.एच.-४ (आताचा ए.एच.-४८) वर आमची गाठ पडायची. कोल्हापूरचे अनिल सर, जे वृत्तपत्राच्या गाडीचे चालक होते. सरळ नाक, अंडाकृती चेहरा आणि रस्स्यासारखीच झणझणीत पण प्रेमळ 'कोल्हापुरी' बोली! वेळेचे पक्के आणि वेगाचे राजे असलेले अनिल सर आणि मी, मसुूर-कराड मार्गे नेर्लेपर्यंतचा तो दीड वर्षांचा प्रवास आजही डोळ्यासमोर उभा राहतो.

माणुसकीचा पिक-अप:
अनिल सर अतिशय स्पष्ट वक्ते, स्वच्छ मनाचे आणि दयाळू व्यक्तिमत्व! वेळेची आमची दोघांचीही शिस्त इतकी तंतोतंत जुळायची की, प्रत्येक वेळी आम्ही ठरलेल्या ठिकाणी आणि वेळेत भेटायचोच.
नियतीचा खेळ आणि पुन्हा भेट:
२०१४ नंतर माझ्या नोकरीचे स्वरूप बदलले आणि आमचे मार्ग पूर्णपणे विरुद्ध झाले. पण म्हणतात ना, "प्रामाणिक नाती कधीच विसरत नाहीत." २०१९ ची एक संध्याकाळ... पुणे कात्रजचा 'नवले पूल'... आणि अचानक एक परिचित आवाज कानावर पडला— "चला सातारा... कराड... आहे का कोणी?" वळून पाहिले तर समोर पुन्हा एकदा अनिल सर उभे होते! ५ वर्षांनंतरही त्यांनी मला ओळखले आणि नवले पूल ते भरतगाव हा प्रवास पुन्हा एकदा जुन्या आठवणींनी उजळून निघाला.

आजचा दिवस खास:
आज ९ मे दिवशी या प्रेमळ आणि कष्टाळू व्यक्तिमत्वाचा  श्री. अनिल ढवळे सरांचा वाढदिवस!
अनिल सर, तुम्ही केवळ एका प्रवासातील सोबती नव्हता, तर माझ्या आयुष्यातील एका कठीण टप्प्यावर दिलेला तो आधार आजही स्मरणात आहे. तुमच्यासारखी माणसे आहेत म्हणूनच माणुसकी आजही जिवंत आहे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अनिल सर!
तुमचा पुढील प्रवास सुखकर, निरोगी आणि आनंदी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.